बंगळुरुत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांची हत्या केल्याने खळबळ माजली आहे. मुलीने पोलिसांकडे हत्येची कबुली देताना आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं यामुळेच वडिलांची हत्या केली असं सांगितलं आहे. आपण डेटवर गेल्याने वडिलांनी कशा पद्धतीने मारहाण केली आणि मोबाइल वापरण्याचं स्वातंत्र्य काढून घेतलं हेदेखील मुलीने सांगितलं आहे. मुलीचा १९ वर्षीय प्रियकरदेखील यामध्ये आरोपी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून मुलं पालकांविरोधात पुकारत असलेलं बंड हा चर्चेचा विषय ठरत आहे.

रविवारी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली. तर मुलगी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “वडिलांनी प्रियकरासोबत असलेलं नातं स्वीकारण्यास नकार दिला होता. तसंच शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं होतं. वडिलांनी मोबाइल काढून घेतला होता आणि इंटरनेच्या वापरावरही मर्यादा आणली होती”.

उप पोलिस आयुक्त एन शशीकुमार यांनी सोमवारी मुलीने दिलेल्या जबाबाची सविस्तर माहिती दिली. मुलीने सांगितल्यानुसार, “वडिलांना प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मला पट्ट्याने मारहाण केली होती”.

सोशल मीडियाच्या वापरावर आलेली बंधनं आणि मित्रांना भेटण्यासाठी घालण्यात आलेली बंदी यामुळेच मुलीने टोकाचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे. शाळेत असतानाच मुलीचे प्रियकरासोबत संबंध होते. प्रियकर शाळा सोडून कॉलेजात गेल्यानंतरही त्यांच्यातील संबंध कायम होते. “दोघेही अनेकदा मॉलमध्ये भेटायचे तसंच फोनवर बोलत असायचे. मुलीच्या वडिलांना हे कळल्यानंतर त्यांनी हे नातं संपवण्यास सांगितलं होतं”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रियकराने मुलीला एक मोबाइल गिफ्ट केला होता. यावरुन ते नेहमी लपून संवाद साधत असतं. पण जेव्हा मुलीला वडिलांकडून त्रास होऊ लागला तेव्हा ते अनेकदा याचा बदला घेतला पाहिजे अशी चर्चा करु लागले होते. नंतर दोघांनीही हत्येचा कट रचला. मुलीने वडिलांच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि प्रियकराला घरी बोलावून घेतलं. वडील बेशुद्द पडले आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी मुलगी सतत कानाखाली मारत होती. काही वेळाने दोघांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केली. दोघांनी हत्येची कबुली दिली असल्याचं शशीकुमार यांनी सांगितलं आहे.