येथील १५ वर्षीय जान्हवी बेहलने जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला खुल्या चर्चेचे आव्हान केले आहे.  अलीकडेच २६ फेब्रुवारीला प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानातील योगदानासाठी तिला सन्मानित करण्यात आले होते.
काहीही न करता बोलणं खूप सोपं असतं. नरेंद्र मोदींची भारतातील नागरिकांनी पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. त्यांच्याविरोधात भाष्य करण्यापेक्षा त्यांच्यासारखं कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे अशा शब्दात जान्हवी बेहलने कन्हैयाचा समाचार घेतला. तसेच, संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे पण याचा अर्थ आपण मर्यादा ओलांडावी असा होत नाही. कन्हैया कुमार सांगेल तेव्हा आणि सांगेल तिथे त्याच्याबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर खुली चर्चा करायला मी तयार आहे, असे जान्हवीने म्हटले. जान्हवी डीएव्ही पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. रक्षा ज्योती फाऊंडेशन या एनजीओची ती सक्रीय सदस्यही आहे. स्वच्छ भारत अभियानातील योगदानाबद्दल तिला अलीकडे प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले होते.
देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमारची तिहार तुरुंगातून गुरुवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर विद्यापीठ परिसरात उशीरा रात्री बोलताना भारतापासून नव्हे तर भारतातमध्ये स्वातंत्र्य हवे अशी मागणी करत त्याने मोदी सरकारवर सडकून टिका केली होती.