तीन दिवसांपूर्वी आढळलेला १५ वर्षीय मृत तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर २२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लुधियाना येथे रेल्वेच्या एका पडक्या इमारतीत हा मृतदेह आढळला होता. तरुणाच्या डोक्यावर काही गंभीर जखमा आढळल्या आहेत. पीडित तरुण खासगी शाळेत आठवीत शिकत होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृत तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न होताच २२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यामध्ये त्याच्या कुटुंबातील सातजण, पाच वरिष्ठ पोलीस कर्मचारी ज्यांनी घटनास्थळी भेट दिली होती आणि इतर पोलीस कर्मचारी ज्यांचा मृतदेहाशी संपर्क आला होता यांचा समावेश आहे.

लुधियाना पोलीस खात्यातील पाच पोलीस अधिकारी ज्यामध्ये डीसीपी, एडीसीपी आणि एसीपींचा समावेश आहे त्यांनी तरुणाचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी भेट दिली होती. यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. इतर सहा पोलीस कर्मचारी ज्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे ते मृतदेहाच्या संपर्कात आले होते किंवा तपासाचा भाग होते.

क्वारंटाइन करण्यात आलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक गुरचरणजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “१२ मार्च रोजी आम्हाला रेल्वे कॉलनीमधील एका पडक्या इमारतीत १५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार मुलाचं आपल्या भावंडांसोबत भांडण झालं होतं. यानंतर तो घरातून निघून गेला होता. मोठं काही कारण नसल्याने तो पुन्हा घरी परत येईल असं आम्हाला वाटल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे. पण नंतर आम्हाला त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर जखमा असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे”.

तरुण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तो राहत असलेला परिसर सील करण्यात आला असून त्याच्या कुटुंबाला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान मृतदेहाचं शवविच्छेदन करायचं की नाही याबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.