पूर्व सिक्कीममधील नथू ला येथे तुफान हिमवृष्टीमुळे अडकून पडलेल्या सुमारे दीड हजार पर्यटकांची सुटका लष्कराच्या जवानांनी केली. एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात शनिवारी ही माहिती देण्यात आली.

गंगटोकहून निघालेले १५०० ते १७०० पर्यटक सुमारे तीनशे वाहनांतून जवाहरलाल नेहरू रस्त्याने जात होते. शुक्रवारी हे पर्यटक ‘१३ वा मैल’ आणि नथू ला यांच्या दरम्यान असताना प्रचंड हिमवर्षांत अडकून पडले होते. त्यामुळे लष्कराच्या जवानांनी यापैकी १५०० पर्यटकांची सुटका केली. यात महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी ५७० जणांची सोय नजीकच्या लष्करी छावणीत केली आहे. सुटका केलेल्या सर्वच प्रवाशांना अन्न, उबदार कपडे आणि गरजेनुसार औषधे पुरविण्यात आली, असे लष्करातर्फे सांगण्यात आले.

रस्त्यावर साचलेले बर्फ दूर करण्यासाठी बुलडोझर आदींचा वापर केला जात आहे. अडकलेले सर्व पर्यटक गंगटोकला पोहोचेपर्यंत लष्कराचे मदतकार्य सुरू राहील.