पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कैद्यांना विशेष सवलती द्यायला मंजुरी दिली आहे. मात्र, ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे किंवा त्याचे रुपांतर आजन्म तुरुंगवासात झाले आहे, अशा कैद्यांना या सवलती मिळणार नाहीत. तसेच हुंडाबळी, बलात्कार, मानवी तस्करी आणि पोटा, टाडा, पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषी असणाऱ्यांनाही सवलत मिळणार नाही.

महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करण्याचा एक भाग म्हणून पुढील गटातील कैद्यांचा विशेष सवतीसाठी विचार केला जाईल आणि तीन टप्प्यांमध्ये त्यांची सुटका केली जाईल. पहिल्या टप्प्यात 2 ऑक्टोबर 2018 रोजी (महात्मा गांधी जयंती) कैद्यांची सुटका केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात 10 एप्रिल 2019 रोजी (चंपारण सत्याग्रहाचा वर्धापन दिन) तर तिसऱ्या टप्प्यात 2 ऑक्टोबर 2019 रोजी (महात्मा गांधी जयंती) कैद्यांची सुटका केली जाईल.

कोणत्या कैद्यांना मिळणार सवलत –

  • 55 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या महिला ज्यांनी त्यांच्या एकूण शिक्षेच्या 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
  • 55 किंवा त्याहून अधिक वय असलेले तृतीयपंथीय ज्यांनी एकूण शिक्षेपैकी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
  • 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे पुरूष कैदी, ज्यांनी एकूण शिक्षेपैकी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
  • 70 टक्के अपंगत्व असलेले अपंग कैदी ज्यांनी एकूण शिक्षेपैकी 50 टक्के शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.
  • दुर्धर आजार असलेले कैदी
  • दोषी कैदी ज्यांनी एकूण शिक्षेच्या दोन-तृतीयांश (66 टक्के) शिक्षा भोगली आहे.

पात्र कैद्यांची सूची तयार करण्यासंदर्भात गृहमंत्रालय सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी करेल. याप्रकरणी लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रशासनांना समिती स्थापन करायला सांगितले जाईल. राज्य सरकार समितीच्या शिफारशी राज्यपालांना सादर करेल. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर तीन टप्प्यात कैद्यांची सुटका केली जाईल.