आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्हय़ामध्ये बांधकाम साहित्य वाहून नेणारा ट्रक उलटून १६ मजूर ठार झाले तर इतर आठ जण जखमी झाले आहेत. हा ट्रक बांधकाम साहित्याने भरलेला होता व त्यात ३५ कृषी मजूर बसलेले होते.
१२ टायरचा हा ट्रक उलटल्याने बांधकाम साहित्याखाली दबल्याने १६ मजूर मरण पावले. पूर्व गोदावरी जिल्हय़ात गंदेपल्ली खेडय़ात ही घटना घडल्याचे जिल्हाधिकारी एच. अरुण कुमार यांनी सांगितले.
एकूण १६मृतदेह सापडले आहेत. हे मजूर पामच्या शेतात काम करीत होते व या ट्रकमधून प्रवास करीत होते. ट्रक गुंटूर जिल्हय़ातील दाचेपल्ली येथून निघाला होता. यात आठ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहेत. त्यांना राजमुंद्री येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटला.
चालक व क्लीनर दोघेही फरार होते. दरम्यान या ट्रकचा चालक पोलिसांना शरण आल्याचे समजते. राज्याचे अर्थमंत्री वाय. रामकृष्णडू यांनी घटनास्थळी भेट दिली व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत जाहीर केली.