22 September 2020

News Flash

विमान कोसळले

केरळमध्ये अपघातात १६ मृत्युमुखी, १२३ जखमी 

संग्रहित छायाचित्र

दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १६ जणांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले.

हे विमान रात्री ७.४१ वाजता कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डय़ात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३० फुटी खड्डय़ात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) निवेदनाद्वारे दिली. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बोइंग-७३७ हे विमान धावपट्टीवरू घसरल्याने हा अपघात झाला. विमान उतरताना त्यात आग लागली नव्हती, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने स्पष्ट केले. या विमानात १७४ प्रवासी, दहा बालके, दोन वैमानिक आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली.

या अपघातात किमान १६ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला ‘डीजीसीए’ आणि केरळचे मंत्री के टी जलील यांनीही दुजोरा दिला. विमानात अडकलेल्या सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपघाताचे वृत्त कळताच केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पोलीस, अग्निशामक दलाचे जवान आणि आपत्कालीन बचाव पथकांना युद्धपातळीवर बचावकार्य करण्याचे आदेश दिले. जखमींना कोढिकोड आणि मलाप्पूरम येथील रुग्णांलयांमध्ये दाखल करण्यात आल्याचे केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले. कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेल्या अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही शैलजा यांनी सांगितले.

विमान दुर्घटनेची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना दूरध्वनी करून केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. कोझिकोड आणि केरळमधील अन्य वरिष्ट अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. पी. विजयन यांनीही आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

या दुर्घटनेमुळे मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर २२ मे २०१० रोजी घडलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमान अपघाताच्या स्मृती जागवल्या गेल्या. या अपघातात वैमानिकाच्या चुकीमुळे १६६ पैकी १५८ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता.

मुंबईतील वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू

विमान दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक वैमानिक मुंबईतील असून त्यांचे नाव दीपक वसंत साठे असे आहे. दीपक साठे १९८१ मध्ये हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पुण्यातील एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. २००३ पर्यंत त्यांनी लढाऊ वैमानिक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर निवृत्ती घेऊन ते एअर इंडियामध्ये कार्यरत होते. सुरुवातीला अनेक वर्षे त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठय़ा आकाराचे एअरबस ३१० हे विमान उडवले. त्यानंतर अलिकडेच ते बोइंग विमानावर रूजू झाले होते. दीपक साठे हे हवाई दल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर होते.

मदतीसाठी.. नातेवाईकांनी माहितीसाठी ०४९५-२३७६९०१ या हेल्पलाइन क्रमांकावर दूरध्वनी करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:58 am

Web Title: 16 death 123 injured in kerala plane crash abn 97
Next Stories
1 संशोधन, विश्लेषणातून विद्यार्थ्यांचे शिक्षण!
2 मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन 
3 केरळ विमान अपघातात ठार झालेला वैमानिक महाराष्ट्राचा पुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव
Just Now!
X