जगभरातील १६ लाख नागरिक बुरशीजन्य आजारांचे बळी

रसिका मुळ्ये, फगवाडा

पेनिसिलीनच्या माध्यमातून अनेकांसाठी जीवनदायी ठरलेल्या बुरशीच्या काही प्रजाती या सध्या जगभरातील लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असून जगभरात गेल्या काही वर्षांत १६ लाख नागरिकांचा मृत्यू बुरशीजन्य आजारांमुळे झाला आहे. भारतातही गेल्या आठ वर्षांत ‘सी ऑरिस’ या बुरशीचा प्रादुर्भाव वाढला असून अतिदक्षता विभागातील जवळपास २० टक्के रुग्णांचा या बुरशीमुळे मृत्यू होत असल्याची माहिती इंटरनॅशनल सोसायटी फॉर ह्य़ुमन अँड अनिमल मायकॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. अरुणलोक चक्रवर्ती यांनी शुक्रवारी दिली.

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जगभरात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची बाब डॉ. चक्रवर्ती यांनी मांडली.

जगभरात बुरशीमुळे होणाऱ्या विविध आजारांचे तीन कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारताचे हवामान हे बुरशीसाठी अधिक पोषक असल्यामुळे भारतातही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. भारतातील रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागांमध्ये ‘कॅन्डिया ऑरिस’ या बुरशीचा प्रादुर्भाव आढळत आहे. २०११ मध्ये या बुरशीमुळे रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतातील २७ मोठय़ा रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांमध्ये संशोधन करण्यात आले. त्यावेळी अतिदक्षता विभागांमधील ६० टक्के रुग्णांवर या बुरशीचा प्रादुर्भाव असल्याचे समोर आले. त्यातील २० टक्के रुग्णांचा मृत्यू हा या बुरशीमुळे झाला. आतापर्यंत सी ऑरिसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही हजारोंच्या घरात पोहोचली आहे. या बुरशीचा प्रादुर्भाव फक्त रुग्णालयांमध्येच आढळतो. काही रुग्णालयांच्या एअर कंडिशन डक्टमध्ये ही बुरशी आढळली होती. मात्र त्याचे उगमस्थान अद्यापही ठामपणे सांगता येणार नाही, अशी माहिती डॉ. चक्रवर्ती यांनी दिली.

सी ऑरिसप्रमाणेच बुरशीच्या इतर काही प्रजातींमुळे हजारो लोकांना अंधत्व आले आहे. अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत, असे सांगून बुरशीजन्य रोगांवर संशोधन करण्यासाठी देशात अधिक प्रयोगशाळांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. चक्रवर्ती म्हणाले, ‘बुरशीजन्य आजारांकडे आपण कायम दुर्लक्ष करत आलो, मात्र त्याचे स्वरूप आता गंभीर झाले आहे. बुरशीजन्य रोगांवर आपल्याकडे औषधे आहेत, मात्र जिवाणूंचा प्रादुर्भाव आणि बुरशीचा प्रादुर्भाव यामध्ये अनेकदा गफलत होते. त्यामुळे रुग्णावर वेळेत योग्य उपचार होत नाहीत आणि त्याचा मृत्यू होतो. येत्या काळात बुरशीजन्य आजारांवर संशोधन करण्यासाठी ४० प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.’