तालिबानी संघटनेच्या अत्यंत वरच्या थरातील १६ अतिरेक्यांनी या महिन्याच्या प्रारंभी अफगाणिस्तानात एक बैठक घेऊन पेशावरच्या शाळेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचून तडीस नेला. या बैठकीत तालिबान्यांचा प्रमुख मुल्ला फझलुल्ला हाही सामील असल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. या हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४८ जण ठार झाले होते.
या बैठकीत फझलुल्ला याच्यासह त्याचा उपप्रमुख शेख खलीद हक्कानी, हाफीझ सईद, क्वारी सैफुल्ला हेही सहभागी झाले होते. शाळेवर हल्ला करण्यासाठी सात अतिरेक्यांना पेशावरजवळच्या खैबर प्रांतातील बारा विभागांत ‘प्रशिक्षण’ देण्यात आले होते. हे हल्लेखोर त्यांच्या मूळ गावांच्या नावावरून ओळखले जात होते, असेही उघड झाले आहे.
शाळेच्या आवारात ज्या वाहनातून हल्लेखोर आले होते, त्या वाहनाच्या मालकाचाही पोलिसांनी शोध लावला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या अतिरेक्यांशी त्याचे काही लागेबांधे आहेत काय, याचा पोलीस तपास घेत आहेत. यासाठी अफगाणिस्तान सुरक्षा दलांचीही मदत घेण्यात येणार आहे.

आता काय करायचं?
सगळ्या मुलांना तर आम्ही मारून टाकलंय.. आता पुढे काय करायचं?’ शाळेतील मुलांना ठार मारणाऱ्या एका दहशतवाद्याने बेछूट गोळीबारानंतर थंड डोक्याने आपल्या साथीदाराला हा सवाल केला.. त्यावर त्याचे उत्तर होते, ‘थांब जरा, आता लष्कराचे लोक येतील, स्वत:ला उडवून देण्यापूर्वी त्यांनाही ठार कर.’ त्याने हा ‘आदेश’ या अतिरेक्याला दिला. पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.