छत्तीसगडमध्ये १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी पीडितेसोबत कुटुंबातील दोन सदस्यांचीदेखील हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलगी, तिचे वडील आणि त्यांच्या चार वर्षांच्या नातीची काठी आणि दगडाने हत्या करुन मृतदेह जंगलात टाकून दिले होते.
२९ जानेवारीला ही घटना घडली असून मंगळवारी सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर सहा आरोपींना अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व सहा आरोपींची ओळख पटली आहे. पीडित मुलीचे वडील मुख्य आरोपीच्या घऱी गुरांची देखभाल करण्याचं काम करत होते.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी संतराम मंझवार तिघांनाही दुचाकीवरुन घरी सोडण्यासाठी चालला होता. यावेळी कोराई गावात त्याने गाडी थांबवली आणि मद्यप्राशन केलं. यादरम्यान इतर आरोपीही तिथे पोहोचले होते. आरोपीने तिघांनाही आपल्यासोबत जंगलाने वेढलेल्या जवळच्या टेकडीवर नेलं आणि मुलीवर बलात्कार केला. यानंतर त्याने तिघांची हत्या करुन मृतदेह जंगलात टाकून दिले असं पोलिसांनी सांगितलं आहे.
“पीडित व्यक्तीच्या मुलाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि सहाही आरोपींची चौकशी केली,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आरोपीने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पीडित मुलगी जिवंत असून इतर दोघांचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं, पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 4, 2021 8:33 am