पंजाबमध्ये १७ वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. पीडित तरुण आणि आरोपी दोन्हीही दलित समाजातील आहेत. शनिवारी हा प्रकार घडला असून रविवारी सकाळी मृतदेह सापडला. पोलीस अधिकारी सुखजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तपासात जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार जसप्रीत सिंह याला आधी दोरच्या सहाय्याने खांबाला बांधण्यात आलं. नंतर पेट्रोल शिंपडत जिवंत जाळण्यात आलं”.

“जसप्रीतचा मोठा भाऊ कुलविंदर सिंह याने जशनची बहिण रजो कौर हिच्याशी अडीच वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. गावापासून ३० किमी अतंरावर राहणारे दोघेही यानंतर कधीच आपल्या गावी परतलेत नाहीत. त्यांना दीड महिन्याचा मुलगाही आहे. जशनच्या कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत अनेकदा जशन आणि कुटुंबाची खिल्ली उडवत असे. तसंच कुलविंदर लवकरच पुन्हा घऱी येऊन सोबत राहणार आहे असंही सांगत असे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचं कुटुंब या लग्नामुळे नाराज होतं आणि दांपत्याला लग्नानंतर गावात येऊ देत नव्हते. जसप्रीत वारंवार खिल्ली उडवत असल्यानेच हा प्रकार घडला असावा अशी माहिती मिळाली आहे.

जसप्रीतचे वडील सुरत सिंह यांनी सांगितल्यानुसार, “शुक्रवारी रात्री जशन, त्याचा चुलत भाऊ गुरजीत आणि मित्र राजू याच्यासोबत घऱात आला आणि जसप्रीतला घेऊन बाहेर गेला. जसप्रीत न परतल्याने आम्ही पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी शोध सुरु केला असता त्यांना मृतदेह सापडला. रविवारी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले”.