28 September 2020

News Flash

नेपाळमधील अपघातात १७ भारतीय ठार

गुजरातमधून नेपाळला गेलेल्या यात्रेकरूंची बस महामार्गावर १०० फूट खोल कोसळून १७ भारतीय प्रवासी ठार झाले, त्यात नऊ महिलांचा समावेश आहे. इतर २८ जण जखमी झाले

| April 23, 2015 01:18 am

गुजरातमधून नेपाळला गेलेल्या यात्रेकरूंची बस महामार्गावर १०० फूट खोल कोसळून १७ भारतीय प्रवासी ठार झाले, त्यात नऊ महिलांचा समावेश आहे. इतर २८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भारतीय क्रमांकाची प्लेट असलेली ही बस ४५ यात्रेकरूंना घेऊन निघाली होती. काठमांडूपासून पूर्वेला ७५ कि.मी. अंतरावर धाडिंग जिल्ह्य़ात नावबिसे खेडय़ात हा अपघात झाला. हे यात्रेकरू गुजरातचे होते व ते पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेऊन भारतातील गोरखपूरला परत जात असताना हा अपघात झाला, असे काठमांडूचे पोलीस अधीक्षक बिश्वराद पोखरेल यांनी सांगितले.
या अपघातात १४ प्रवासी जागीच ठार झाले तर इतर तीन जणांचा जखमी अवस्थेत रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना काठमांडू येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. एकवीस जण अजून रूग्णालयात उपचार घेत असल्याचे भारतीय दूतावासाच्या सूत्रांनी सांगितले. दूतावासाने एक खास पथक  अपघाताच्या ठिकाणी समन्वय कार्य करण्यासाठी पाठवले होते. प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्रिभुवन मार्गावर बाजूला हे ठिकाण असून स्थानिक लोक व पोलिसही मदत करीत आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले आहेत. नेपाळमधील पशुपतिनाथाचे मंदिर पाचव्या शतकातील असून पशुपती हा शिवाचा अवतार मानला जातो. पशुपतिनाथ मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिरास भेट दिल्यानंतर वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 1:18 am

Web Title: 17 indian pilgrims killed in nepal road accident
Next Stories
1 अल जझिरा वाहिनीचे प्रसारण बंद
2 सरकार उद्योगपतींच्या हातात इंटरनेट देऊ इच्छिते- राहुल गांधी
3 माझ्या वक्तव्याचा राहुल गांधींकडून विपर्यास – नितीन गडकरी
Just Now!
X