ईशान्य थायलंडमध्ये एका सैनिकाने शनिवारी केलेल्या बेछूट गोळीबारात १७ जण ठार झाले असून तो आता शॉपिंग मॉलमध्ये लपून बसला होता.

रॉयल थाय पोलिस प्रवक्ते क्रिसाना पॅटनचॅरोन यांनी सांगितले, की एकूण १७ जण या हल्ल्यात मारले गेले असून जखमींची एकूण संख्या अजून समजलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाखाँ रॅचसीमा या भागात एका  सैनिकाने सुरुवातीला दुसऱ्या एका सैनिकाला व महिलेला गोळ्या घातल्या आणि नंतर तिसऱ्या व्यक्तीला जखमी केले. नंतर हा हल्लेखोर सैनिक टर्मिनल २१ शॉपिंग मॉलमध्ये गेला व तेथेही त्याने गोळीबार केला. ज्या शहरात हा प्रकार झाला ते कोरात नावानेही ओळखले जाते. या घटनेचे मॉलच्या बाहेर चित्रीकरण करण्यात आले असून ते समाजमाध्यमांवर टाकण्यात आले. त्यात काही लोक गोळीबारापासून वाचण्यासाठी पार्किंगमध्ये लपताना दिसत आहेत. नंतर हा मॉल बंद करण्यात आला. त्याच्या बाहेरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हल्लेखोरास पकडून दुकानातील लोकांची सुटका करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल कोंगचीप तांत्राविच यांनी संशयिताचे नाव जक्रापंथ थोम्मा असल्याचे म्हटले आहे. पोलिस व लष्करी दले यांनी मॉल व आजूबाजूचा परिसर वेढला होता.