भविष्यात जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये भारताचे वर्चस्व असेल. ग्लोबल इकोनॉमिक रिसर्चच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. भविष्यातील जीडीपी दराची तुलना केल्यास चित्र वेगळे असेल. २०१९ ते २०३५ दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या २० शहरांपैकी १७ शहरे एकटया भारतातील असतील असे या अहवालात म्हटले आहे.

बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांची कामगिरी उत्तम असेल असे ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०१९ ते २०३५ दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या १० शहरांमध्ये सूरत पहिल्या स्थानावर असेल. त्याखालोखाल आग्रा, बंगळुरु, हैदराबाद या शहरांचा क्रमांक असेल. नागपूर, तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा ही शहरे सुद्धा टॉप टेनमध्ये आहेत.

सूरत हे सध्या हिरा उद्योगाचे मुख्य केंद्र असून भविष्यात आयटी उद्योगही येथे स्थिरावेल. सध्या बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे टेक्नोलॉजी उद्यगासाठी ओळखली जातात तसेच या शहरांमध्ये वित्तीय सेवा देणाऱ्या अनेक कंपन्याही आहेत. भारताबाहेर नोम पेन्ह तसेच आफ्रिकेतील दार अस सलाम ही शहरे वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आघाडीवर असतील. लोकसंख्येच्या बाबतीत २०३५ साली मुंबई पहिल्या १० मध्ये असेल. २०३५ मध्ये भारतातील शहरांचा एकत्रित जीडीपी चीन, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील शहरांच्या तुलनेत कमीच असेल.