१७ वर्षांच्या मुस्लीम तरुणाला ठार केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना शनिवारी अटक केली आहे. एका आदिवसी मुलीशी या तरुणाचं प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन या चारजणांनी या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. फैज असं या तरुणाचं नाव आहे. त्याला १०-१२ जणांनी काठ्या आणि पाईपने मारहाण केली. गुजरातमध्ये ही घटना घडली आहे.

२४ जुलै रोजी फैजला १० ते १२ जणांच्या जमावाने मारहाण केली. गुजरातच्या झागडीया तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. माझा मुलगा त्याच्या मित्रांसोबत अंकलेश्वर या ठिकाणी गेला होता. मात्र त्याच दिवशी त्याला जमावाकडून मारहाण करण्यात आली असा आरोप फैजचे वडील मोहम्मद सुलतान अब्दुल रहमान कुरेशी यांनी केला. त्याला दयामाया न दाखवता प्रचंड मारहाण करण्यात आली.

फैज अंकलेश्वरला गेला असताना माझ्या पत्नीने मला फोन केला आणि फैज कुठे आहे याची चौकशी केली. त्यानंतर त्याच्या मित्रांकडून मला फैजला मारहाण झाल्याचे समजले. त्याला वाचवण्यासाठी विविध रुग्णालयांमध्ये घेऊन गेलो पण वाचवू शकलो नाही असंही कुरेशी यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मी फैजला घेऊन रूग्णालयात गेलो असता, माझ्या हे लक्षात आले की त्याच्या हाताला, पोटाला, पाठीला प्रचंड जखमा आहेत. त्याला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हाच डॉक्टरांनी सांगितले होते की फैजला प्रचंड मारहाण झाली आहे तो वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यानंतर मी त्याला सुरत येथील रुग्णालयात हलवले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे. मला हे ठाऊक नाही की ते नेमके कोण लोक होते पण अनेक लोकांच्या जमावाने त्याला मारहाण केली. फैजच्या आईनेही आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली आहे. ज्यांनी माझ्या मुलाला बेदम मारहाण केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं फैजच्या आईने म्हटलं आहे. लोक म्हणतात हा हिंदू मुस्लीम वाद होता. मला असं वाटत नाही, माझ्या मुलाने प्रेम केलं यात त्याची चूक काय? असंही फैजच्या आईने विचारलं आहे.