मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये अंतर्वस्त्र चोरी केल्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका जोडप्याने १७ वर्षाच्या मुलाला त्यांची अंतर्वस्त्र चोरी करताना आणि पळ काढताना पाहिले होते. त्यांनी त्याला खोलीत बंद केले. पोलीस आल्यानंतर खोली उघडली असता त्या मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी त्या दाम्पत्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोपाळच्या गांधी नगर परिसरातील ही घटना आहे. १७ वर्षीय मुलगा आपल्या चुलतभावाबरोबर तिथे राहायला आला होता. शनिवारी रात्री शेजार्‍यांनी त्याला अंतर्वस्त्रे चोरी करून पळताना पाहिले. पोलिसांच्या माहितीनुसार, २४ वर्षीय रवी आणि त्याच्या पत्नीने १७ वर्षाच्या मुलाचा पाठलाग केला, त्यानंतर तो चुलतभावाच्या घरात एका खोलीत पळाला. पोलिसांनी याप्रकरणी शेजार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर पंख्याला लटकला होता मुलाचा मृतदेह

“या दापंत्याने त्या मुलाला खोलीत बंद करून त्याच्या चुलतभावाला आणि पोलिसांना बोलावले. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तरूण पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. जी अंतर्वस्त्रे चोरी केल्याचा आरोप दांपत्याने केला होता ती घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहेत” असे गांधी नगरचे एसएचओ अरुण शर्मा म्हणाले.

या मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी चुलतभावाच्या तक्रारीवरून या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा- प्रेमासाठी कायपण! तिच्यासाठी आफ्रिकी आशिक झाला ‘शोले’मधला वीरू…

शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल केल्यानंतरच रविवारी कुटुंबिय अल्पवयीन मुलावर अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. दुसरीकडे, त्या दाम्पत्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की त्या दोघांनी त्यावेळी जे योग्य वाटले ते केले, पण आता त्यांचा छळ केला जात आहे. पोलिसांनी येऊन त्याला पकडतील यासाठीच त्यांनी त्या मुलाला खोलीत बंद केले होते असे नातेवाईकांनी सांगितले.