News Flash

रशियात ब्लू व्हेल गेमच्या अॅडमिन तरुणीला अटक

अल्पवयीन मुलामुलींना या गेमअंतर्गत रोज नवीन आव्हान देण्याचे काम त्यांनी केले

रशियामध्ये १३० तर भारतामध्ये पाच ते सहा जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

ब्लू व्हेल गेमच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या १७ वर्षांच्या तरुणीला रशियातील पोलिसांनी अटक केली आहे. गेममधील स्पर्धकांना आव्हान देणे आणि आव्हान पूर्ण न करणाऱ्यांना धमकावण्याचे काम ती करायची. या गेमची ती मास्टरमाईंड असल्याचा दावाही काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

भारतासह जगभरात सध्या ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. ब्लू व्हेल गेम हा रशियात तयार झाला असून हा गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा आहे. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर स्पर्धकाला फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचा असतो. या गेममध्ये सर्वात शेवटचे आव्हान हे आत्महत्येचे असते. या गेममुळे रशियामध्ये १३० तर भारतामध्ये पाच ते सहा जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

रशियातील तपास यंत्रणेने ब्लू व्हेल या गेमची निर्मिती करणाऱ्या फिलीप बुडेकिन या बावीस वर्षीय तरुणाला अटक केली होती. तो तुरुंगात असला तरी त्याने या गेमसाठी अॅडमिन नेमले होते. यातील एका अॅडमिन तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत तरुणी ही ब्लू गेम व्हेलमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. मात्र तिने आत्महत्येचा टास्क पूर्ण करण्याऐवजी ती स्वतःच अॅडमिन झाली होती. अल्पवयीन मुलामुलींना या गेमअंतर्गत रोज नवीन आव्हान देणे आणि तसेच त्यांनी टास्क पूर्ण न केल्यास त्यांना धमकावण्याचे काम तिने केले होते. या तरुणीचे नाव पोलिसांनी जाहीर केलेले नाही.

गेमचे अॅडमिन हे विविध ऑनलाइन मंच वापरून मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतात. त्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप व इतर मंचांचा वापर केला जातो. भारतात अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या गेमच्या सर्व लिंक तात्काळ हटवण्याचे आदेश गूगल, फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सना दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 4:45 pm

Web Title: 17 year old russian girl arrested mastermind behind blue whale suicide game
Next Stories
1 मोदी मंत्रिमंडळात रविवारी सकाळी १० वाजता फेरबदल ?, राष्ट्रपती भवनात तयारी सुरू
2 नोटाबंदी: रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनंतर संघातील संस्थांकडून मोदींना घरचा आहेर
3 Cabinet Reshuffle: राजीवप्रताप रूडी म्हणाले, मंत्रिपद सोडण्याचा निर्णय माझा नव्हे..
Just Now!
X