लखनऊच्या प्राणीसंग्रहालयात असलेल्या आर्यन या वाघाचा आज मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मागील १७ वर्षांपासून आर्यन हा पर्यटक आणि लहान मुलांचा आकर्षण बिंदू होता. मात्र मागच्या महिन्याभरापासून त्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर उपचारही सुरू होते. आज अखेर आर्यन वाघाचा मृत्यू झाला. आर्यनच्या मृत्यूची बातमी जेव्हा समजली तेव्हा त्याची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

प्राणीसंग्रहालयाच्या रूग्णालय परिसरात आर्यनचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवण्यात आला. तिथेच त्याला हार आणि फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली. प्राणीसंग्रहालयाचे संचालक, रेंजर आणि किपर या सगळ्यांनी आर्यन वाघाला अखेरचा निरोप दिला. आर्यनच्या कुटुंबात विशाखा वाघीण आणि बछडे जय आणि विजय यांचा समावेश आहे. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती संचालकांनी दिली.