नवी मुंबईत एका पुरुषावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशी येथे सोमवारी रात्री ३६ वर्षीय पुरुषाला बेशुद्ध करुन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण ताजे असतानचा आता राजस्थानमध्ये एका सार्वजनिक प्रसाधनगृहामध्ये एका १७ वर्षाच्या तरुणावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाबरोबर हा प्रकार घडला त्याने काही ट्विटस करुन यासंदर्भात माहिती दिली.

चेहऱ्यावर मास्क घालून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी माझ्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहामध्ये बलात्कार केल्याचे या मुलाने ट्विटवर म्हटले आहे. ‘माझ्यावर बलात्कार झालाय. आयुष्य निष्ठूर आहे,’ असं पहिलं ट्विट करत या मुलाने ट्विटवर संपूर्ण घटनाक्रम सांगणारा थ्रेड पोस्ट केला आहे. ‘संधाकाळची वेळ होती. मी रस्त्यावरुन जात होतो. त्यावेळी मी लघवी करण्यासाठी एका सार्वजनिक प्रसाधनगृहामध्ये गेलो. हे प्रसाधनगृह एका कोपऱ्यामध्ये होते. मी आतमध्ये गेलो. त्यानंतर तेथे दोनजण मास्क घालून आले. त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. एकाने माझे हात पकडले. तर दुसऱ्याने माझ्या पार्श्वभागावर हात ठेवले. त्यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. ते खूप वेदनादायक होते. मला अश्रू अनावर झाले. मी तिथून पळून गेलो. काय करावे मला सुचत नव्हते. मी रडत घरी गेलो,’ असं या मुलाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इतकचं नाही तर या मुलाने आजूबाजूच्या लोकांनी माझ्याबरोबर असं होत असतना काहीच केलं नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. यामधून ‘मुलेही सुरक्षित नाहीत हेच मी शिकलोय,’ असं तो म्हणतो.

माझ्यावर बलात्कार होत असताना प्रसाधनगृहामधील इतर व्यक्तींना त्याचा काहीच फरक पडत नव्हता. मला कोणीही मदत केली नाही. माझ्याबरोबर जे झालं ते मला विसरायचं आहे. पण मला होणाऱ्या वेदना त्या प्रसंगाची सतत आठवण करुन देत आहेत. इतर कोणताही विचार सध्या माझ्या मनात येत नाहीय. मी आता १७ वर्षांचा आहे. घडलेल्या घटनेला बलात्कार म्हणावं का हेही मला ठाऊक नाही पण जे झालं ते चुकीचं होतं. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे जे झालं ते मी कोणाला सांगूही शकत नाही. माझे पालक जास्त शिकलेले नाहीत. माझ्या आई-बाबांना हे समजलं तर त्यांना धक्काच बसेल. मी पोलिसांकडेही याबद्दल तक्रार करणार नाही. या घटनेतून मी इतकचं शिकलोय की पुरुषही सुरक्षित नाहीत. माझ्या शहराने माझा घात केला आहे. मी यामधून बाहेर येऊ शकेन की नाही ठाऊक नाही. त्या दोघांनी माझ्यावर भयंकर अत्याचार केले. मी काय केलं पाहिजे हे मला जाणून घ्यायचं असल्याने मी हे सर्व ट्विट करत आहे,’ असं या मुलाने आपल्या टविटमध्ये म्हटलं आहे.

या मुलाचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला मदत देऊ केली.

मिळालेल्या प्रतिसादानंतर या मुलाने ट्विट करुन ‘मी डॉक्टरांची भेट घेतली असून पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद,’ असं ट्विट केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही कारवाई केली का? किंवा पुढे आरोपांना अटक करण्यात आली का याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.