बाराबंकी: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या डबलडेकर बसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १८ जण ठार, तर २५ जण जखमी झाले.

हा अपघात राम सनेही घाट भागात लखनौ-अयोध्या महामार्गावर मंगळवारी उशिरा रात्री झाला. अपघातग्रस्त खासगी बस १३० प्रवाशांसह पंजाब व हरियाणातून बिहारकडे जात होती. तिचा अ‍ॅक्सल तुटल्यामुळे ती रस्त्यावर उभी करण्यात आली असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. यात १८ जण ठार, तर २५ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अपघात झाला, त्यावेळी काही प्रवासी बसच्या बाहेर रस्त्यावर उभे होते किंवा विश्रांती घेत होते, तर इतर प्रवासी बसमध्ये बसले होते. धडकेत ११ जण जागीच ठार झाले, तर ७ जण रुग्णालयात नेत असताना मरण पावले. अपघातबळींपैकी बहुतांश बिहारमधील होते आणि पंजाब व हरियाणात धानाची पेरणी केल्यानंतर परतत होते, असे पोलिसांनी सांगितले.

जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले व गंभीर जखमींना तेथून लखनौतील ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (लखनौ विभाग) एस.एन. सबात यांनी दिली. अपघात झाला तेव्हा जोरदार पाऊस सुरू होता व त्यामुळे बचाव कार्यात अडथळे आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.