देशात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येतो आहे. अशा घटना दररोज घडत आहेत, त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका ११ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. चेन्नईत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चेन्नईतील एका मुलीने १८ जणांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या १८ जणांमध्ये सोसायटीचे सुरक्षा रक्षक, लिफ्ट ऑपरेटर, पाणी पुरवठा करणारे लोक अशांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एका महिला वकिलावर तिच्याच सहकारी वकिलाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. तसेच बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते आहे. अशात चेन्नईतला हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे ७ महिने लैंगिक शोषण करण्यात आले. मुलीने तिच्या घरातल्यांना आपल्या वेदना बोलून दाखवल्यावर या अन्यायाला वाचा फुटली. आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १८ जणांची कसून चौकशी सुरु आहे.