कोची : केरळात २००७ मध्ये शस्त्र प्रशिक्षण शिबिर चालवल्याच्या प्रकरणात सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या १८ सदस्यांना विशेष एनआयए न्यायालयाने मंगळवारी सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, त्यात सफदर नागोरी या सिमी नेत्याचा समावेश आहे. १८ जणांना कालच दोषी ठरवण्यात आले होते.

विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश कौसर एडप्पागथ यांनी त्यांना वेगवेगळय़ा आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, त्यात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटके प्रतिबंधक कायदा, गुन्हेगारी कट कलम १२० बी हे कायदे व कलमांचा समावेश आहे. कलम १० अन्वये एक वर्ष, कलम ३८ (यूएपीए) अन्वये पाच वर्षे, कलम ४ (ईएसए) व कलम १२० बी (भादंवि) अन्वये सात वर्षे या प्रमाणे शिक्षा सुनावण्यात आल्या असून, त्या एकाच वेळी भोगायच्या आहेत, त्यामुळे चौदा आरोपींनी आधीच सात वर्षे तुरुंगात काढलेली असल्याने त्यांची सुटका होणार आहे असे बचाव पक्षाने सांगितले.  स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या सदस्यांनी केरळातील वागमोन येथे डिसेंबर २००७ मध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिर घेतले होते त्या प्रकरणी केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नंतर एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. जिहादचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप या प्रकरणी ठेवण्यात आला होता. नागोरी याच्याशिवाय सादुली, पी. ए. शिबली, महंमद अन्सार, अब्दुल सत्तार (सर्व केरळ), हाफीज हुसेन, महंमद सामी बागेवाडी, नदीम सईद, डॉ. एच. ए. असदुल्ला, शकील अहमद व मिर्झा अहमद बेग (कर्नाटक), आमील परवाझ व कमरुद्दीन नागोरी (मध्य प्रदेश), मुफ्ती अब्दुल बशर (उत्तर प्रदेश), दानिश व मन्झार इमाम (झारखंड), महंमद अबू फैजल खान (महाराष्ट्र) व आलम जेब आफ्रिदी (गुजरात) यांचा दोषी ठरवलेल्यात समावेश आहे.  नागोरी हा सिमीचा संस्थापक सदस्य आहे.