सामूहिक बलात्कारानंतर दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेबाबत तातडीने पावले उचलण्यासाठी महिलांना संकटकालीन साह्य़ मागण्यासाठी दूरध्वनीवरून हेल्पलाइन सेवा सुरू झाल्याला महिना पूर्ण झाला असतानाच आता ‘१८१’ या दूरध्वनीक्रमांकाची ही सेवा देशभर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री कपिल सिब्बल यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
आपण सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यासाठी पत्र लिहित आहोत. या निर्णयाला सर्व राज्यांचा पाठिंबा मिळाला की मग या तीनआकडी क्रमांकावरून सेवा पुरविणारे कक्ष तसेच मदत पुरविण्यासाठीची मदत तसेच दक्षता पथके राज्यांना स्थापन करावी लागतील. त्यानंतर ही हेल्पलाइन देशभर सुरू होईल, असे सांगण्यात आले.
दिल्लीतील सामूहिक बलात्काराची तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटताच दिल्लीसाठी सरकारने १६७ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली होती. मात्र लक्षात ठेवायला अधिक सोपा क्रमांक असावा यासाठी १८१ हा क्रमांक देण्यात आला.