मध्य प्रदेशमध्ये आज राजकीय भूकंप घडला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाय, ते भाजपात प्रवेश करण्याचा मार्गावर देखील आहेत. एवढच नाहीतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या तब्बल १९ आमदारांनी देखील राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे या १९ आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचा देखील समावेश आहे. यामुळे आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. जो काँग्रेसकडूनही तातडीने स्वीकरण्यात आला. या नंतर आता ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेल्या व बंगळुरू येथील एका रिसॉर्टमध्ये थांबलेल्या काँग्रेसच्या सहा मंत्र्यांसह १९ आमदारांनी देखील राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी आपल्या राजीनाम्याच्या प्रतींसह फोटो देखील काढला आहे.

विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी देखील या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया देताना, मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं मला वाटत नाही, असं म्हटलं होतं.