समुद्री चाच्यांकडून अफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरुन गेल्या महिन्यात एका व्यापारी जहाजातून अपहरण केलेल्या २० पैकी १९ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तर एकाचा कैदेत असताना मृत्यू झाला आहे. नायजेरीयाची राजधानी अबुजा येथे असलेल्या भारतीय उच्चायोगाने याबाबत माहिती दिली आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी नायजेरियाच्या अधिकाऱ्यांबरोबरच शेजारील देशांच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती.

अफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून १५ डिसेंबर रोजी जाणाऱ्या एक व्यापारी जहाजावर (MT Duke) समुद्री चाच्यांनी कब्जा केला होता आणि या जहाजाच्या कॅप्टनसह २० भारतीय कामगारांचे अपहरण केले होते.

दरम्यान, अबुजा येथील भारतीय उच्चायोगाने ट्विट करुन सांगितले की, १९ भारतीय नागरिकांची शनिवारी सुटका करण्यात आली. मात्र, या चाच्यांच्या कैदेत असलेल्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपहरण करण्यात आलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न केल्याबद्दल नायजेरियन अधिकाऱ्यांचे भारताने आभार मानले आहेत.

यापूर्वी नायजेरियामध्ये सन २०१६ मध्ये मैंगापुडी श्रीनिवास आणि कौशल अनीस शर्मा या दोन भारतीयांचे स्थानिक गुन्हेगारांनी अपहरण केले होते. त्यांना नंतर सोडवण्यात आले होते. यांच्या सुटकेसाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची महत्वाची भुमिका बजावली होती.