आसामच्या दक्षिणेकडील बराक खोऱ्यातील हैलाकंडी, करिमगंज आणि काचर जिल्ह्य़ात मंगळवारी सकाळी मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन किमान १९ जण ठार झाले, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हैलाकंडी जिल्ह्य़ातील मोहनपूर परिसरात भूस्खलन होऊन दगडमातीचा ढिगारा पत्र्याच्या एका घरावर कोसळला, त्यामध्ये दोन मुले आणि एका महिलेसह सात जण ठार झाले, तर अन्य दोन जण जखमी झाले, असे प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले. जखमींना तातडीने एस. के. सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करिमगंज जिल्ह्य़ात भूस्खलनामुळे एक महिला आणि तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले, असे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार संजित कृष्णा यांनी सांगितले. तर काचर जिल्ह्य़ातील कोलापूर गावात भूस्खलनात सात जण ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.