News Flash

मिनी बसला रेल्वेची धडक; भीषण अपघातात १९ शीख भाविक जागीच ठार

कराचीहून लाहोरच्या दिशेन जात होती रेल्वे

घटनास्थळाची पाहणी करताना अधिकारी. (फोटो सौजन्य : एएनआय)

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका एक्स्प्रेस रेल्वेगाडीनं शीख भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला धडक दिली. या भीषण अपघातात १९ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. यात ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाहोरपासून ६० किमी अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

पेशावर येथून २२ शीख भाविक एका मिनी बसमधून नानकाना येथील गुरूद्वारात प्रार्थनेसाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर हे सर्व भाविक परत पेशावरकडे निघाले होते. परतीच्या प्रवासात असताना सच्चा सौदा फारूकाबाद शेखुपुरा येथील मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर त्यांच्या मिनी बसला भरधाव एक्स्प्रेस गाडीनं उडवलं.

शाह हुसैन एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी कराचीहून लाहोरला जात होती. त्याचवेळी मिनी बस समोर आली. लाहोरपासून ६० किमी अंतरावर ही घटना घडली. यात मिनी बसमधील १९ भाविक जागीच ठार झाले. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. “पाकिस्तानातील शीख भाविकांच्या मृत्यूमुळे दुःखी झालो आहे. दुःखाच्या क्षणी माझ्या सहवेदना मृतांचे कुटुंबीय व मित्रांच्यासोबत आहे. जखमी झालेले भाविक लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 6:40 pm

Web Title: 19 sikh pilgrims returning from nankana sahib killed after train hits bus bmh 90
Next Stories
1 कमलनाथ हे करोनापेक्षाही मोठी समस्या; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची टीका
2 गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस
3 जीवदान देणाऱ्या मालकिणीचं निधन, मृतदेहाला पाहिल्यावर कुत्र्यानेही सोडले प्राण
Just Now!
X