इजिप्तमधील ऐतिहासिक लक्झर शहरात एअर बलूनला आग लागून झालेल्या स्फोटात १९ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.  मृत पर्यटकांमध्ये मुख्यत: आशियाई आणि युरोपियन पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिक तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्काय क्रूझ कंपनीचा एअर बलून मंगळवारी सुमारे २० पर्यटकांना घेऊन उड्डाण करीत होता. बलून ३०० मीटर (एक हजार फूट) उंचीवर असताना अचानक आग लागल्याने तो पेटला आणि त्याचा स्फोटा झाला. या दुर्घटनेत १९ पर्यटकांचा जळून मृत्यू झाला तर बलून उडवणारा चालक आणि एका पर्यटकाने उडी मारल्यामुळे ते बचावले. गंभीररीत्या जखमी झालेल्या या दोघांवर लक्झर आंतरराष्ट्रीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लक्झर सरकारच्या सुरक्षा विभागाचे संचालक जनरल मामदोघ खलीद यांनी दिली.
पर्यटकांमध्ये नऊ हाँगकाँग, चार जपान, तीन इंग्लंड, दोन फ्रान्स आणि एका हंगेरियन नागरिकाचा समावेश होता. याशिवाय इजिप्तचा नागरिक असलेला चालक आणि अन्य स्थानिक पर्यटकही या बलूनमध्ये बसले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाईल नदी तसेच इजिप्तमधील प्राचीन मंदिरे उंचावरून पाहता यावीत यासाठी बलून सफर आयोजित केली जाते. परदेशी पर्यटकांचा या बलून सफरीला मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र आजची दुर्घटना सर्वात मोठी असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. १९८९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये दोन बलूनची धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता.