अमेरिकेतील एका प्रसिद्ध पंखा निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपले एक लाख ९० हजार पंखे ग्राहकांकडून परत मागवले आहेत, म्हणजेच रिकॉल केले आहेत. या पंख्यांची पाती अचानक निखळून फडतात अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्यानंतर कंपनीने रिकॉलचा निर्णय घेतल्याचे सीएननने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

फ्लोरिडा येथील लोकप्रिय फॅन उत्पादक कंपनी असणाऱ्या आणि किंग ऑफ फॅन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोर्ट लॉडेरडेलने आपले ५४ इंचाचे मारा सिलिंग फॅन्स कॉलबॅक केलेत. कंपनीच्या ४७ ग्राहकांनी फॅनची पाती खाली पडल्याची तक्रार केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेतील ग्राहक वस्तू सुरक्षा मंडळाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. देशभरातील होम डेपोच्या दुकानांमधून या फॅनची विक्री करण्यात आली होती. या सदोष फॅन्समुळे झालेल्या अपघातापैकी दोन प्रकरणांमध्ये ग्राहकांना दुखापत झाली आहे तर चार प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या संपत्तीला नुकसान झालं आहे असं सांगण्यात आलं आहे.

किंग ऑफ फॅन्सने त्यांचे सर्व मारा सिलिंग फॅन्स परत मागवलेले नाहीत. केवल मॅट व्हाइट, मॅट ब्लॅख, काळ्या आणि पॉलिश नेक फिनिशिंग असणारे फॅन्स कंपनीने परत मागवलेत. मंडळाने हे प्रोडक्ट वापरु नका असं ग्राहकांना सांगितलं आहे. या फॅन्सचा वापर तातडीने बंद करावा असं ग्राहक सुरक्षा मंडळाने जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे. “ग्राहकांना या फॅनच्या पात्यांमध्ये काही दोष दिसून आला किंवा फॅन फिरताना काही दोष जाणवल्यास त्यांनी तातडीने किंग ऑफ फॅन्सला संपर्क करुन फॅन मोफत बदलून घ्यावा,” असं मंडळाने म्हटलं आहे.

किंग ऑफ फॅन्सने फॅनच्या निर्मितीमध्ये कमतरता राहिल्याने हे सारं घडल्याचं म्हटलं आहे. फॅनच्या फ्लायव्हीलमधील लॉकिंग क्लिपमध्ये दोष असल्याने पाती गळून पडत असल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. लॉकिंग क्लिप योग्य ठिकाणी बसवणाऱ्या स्कूपैकी एक स्कू फ्लायव्हील योग्य प्रकारे धरुन ठेवत नसल्याचे निरदर्शनास आलं आहे, असं कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच फॅन सुरु केल्यानंतर फॅनची पाती गळून पडण्याचा धोका असून यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते असा इशाराही कंपनीने ग्राहकांना दिलाय. हे सर्व फॅन एप्रिल २०२० ते ऑक्टोबर २०२० दरम्यान होम डेपोच्या स्टोअर्समधून अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये विकण्यात आलेत. या प्रत्येक फॅनची किंमत १५० डॉलर म्हणजेच १० हजार ९०० भारतीय रुपयांच्या आसपास आहे. या फॅन्समध्ये दोष असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व फॅन्सची विक्री थांबवली असंही कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांच्या सुरक्षेला आमचं कायमच प्राधान्य राहिलं आहे असंही कंपनीने म्हटलं आहे.