डॉ. मनमोहन सिंग यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर देशात उसळलेल्या शीखविरोधी दंगलींबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्या वेळी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला तत्कालीन गृहमंत्र्यांनी ऐकला असता तर दंगल टाळता आली असती, असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले. गुजराल यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यानंतर गुजराल तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले की, स्थिती गंभीर असल्याने सरकारने शक्य तितक्या लवकर लष्कराला पाचारण करावे. गुजराल यांचे म्हणणे त्या वेळी ऐकले असते तर हिंसाचार नियंत्रणात आणता आला असता, असे डॉ. सिंग म्हणाले.

डॉ. सिंग यांच्या विधानाने आपल्याला खूप वेदना झाल्या असल्याचे शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी म्हटले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दूषणे दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न धक्कादायक आहे, असेही बादल यांनी म्हटले आहे. डॉ.  सिंग यांनी केलेला दावा सत्यही नाही आणि योग्यही नाही, असेही ते म्हणाले. डॉ. सिंग यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे, मात्र त्यांनीच असा दावा करणे धक्कादायक आहे, असेही ते म्हणाले. देशात १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलींमध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना गोवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकारावर भाजपनेही टीका केली आहे.