माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दंगल भडकली. दिल्लीतही दंगल उसळली होती, मात्र या सगळ्या दंगली दरम्यान दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे माझ्यासोबत रस्त्यावर फिरत होते असे वक्तव्य १९८४ च्या दंगलीचे मुख्य आरोपी आणि माजी खासदार जगदीश टायटलर यांनी केले आहे. दिल्लीतील रस्त्यांवर राजीव गांधी माझ्यासोबत दंगल कशी घडते आहे त्याचा आढावा घेत होते असे वादग्रस्त वक्तव्य टायटलर यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टायटलर यांनी हे वक्तव्य केले आहे. बाहेर दंगल उसळली होती. तेव्हा राजीव गांधी माझ्यासोबत कारमध्ये बसले आणि त्यांनी दिल्लीत काय घडते आहे याचा अंदाज घेतला. राजीव गांधी काँग्रेस खासदारांवर नाराज झाले होते. आपल्या मतदार संघात शांतता बाळगा असे आदेश त्यांनी काँग्रेस खासदारांना दिले होते असेही टायटलर यांनी स्पष्ट केले.

जगदीश टायटलर यांचे हे वक्तव्य समोर येताच पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. टायटलर यांनी केलेल्या वक्तव्यानुसार राजीव गांधी हे १९८४ मध्ये दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते. टायटलर यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे हत्या कशाप्रकारे होत आहेत यावर नजर ठेवून होते असाही होतो असेही बादल यांनी म्हटले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात सीबीआयने लक्ष घालावे अशीही मागणी केली आहे.

दरम्यान जगदीश टायटलर यांचे वक्तव्य निराधार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच १९८४ ला असे काहीही घडले नव्हते असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दंगल उसळली होती. या दंगलीच्या तपासासाठी नानावटी आयोग स्थापण्यात आला होता. या आयोगाने जगदीश टायटलर यांना हिंसाचारामागचे मुख्य आरोपी असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे सुरु आहे.

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्याच अंगरक्षकांनी केली होती. या हत्येनंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये दंगली उसळल्या. या दंगलीत ३ हजार पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. तर एकट्या दिल्लीत २ हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. याच दंगलीसंदर्भात काँग्रेसचे माजी खासदार जगदीश टायटलर यांनी राजीव गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मात्र या सगळ्या गोष्टी निराधार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.