देशात १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत सहभाग असलेल्या पक्षसदस्यांची नावे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर करावी, अशी मागणी शीख समाजातील विविध गटांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयासमोर निदर्शने करताना केली.
पक्षाच्या काही नेत्यांचा १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हात असण्याची शक्यता असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी अलीकडेच एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते.
या वेळी निदर्शकांनी काँग्रेसविरोधी घोषणाबाजी करून काळे झेंडे आणि फलक फडकाविले. शीखविरोधी दंगलींच्या संदर्भात सीबीआयने राहुल गांधी यांची चौकशी करावी, असे एका फलकावर लिहिले होते. आम्हाला न्याय हवा आहे, दंगलींमध्ये कोणाचा हात होता त्यांची नावे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे, असे एका निदर्शकाने सांगितले.
दंगलींची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला असून त्याबाबत विचारले असता हा निदर्शक म्हणाला की, गेल्या २५ वर्षांपासून आमची हीच मागणी आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमच्याबद्दल खरोखरच आत्मीयता वाटत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो, मात्र ते राजकारण खेळत असतील तर त्यांनी तसे करू नये, अशी आमची त्यांना विनंती आहे, असेही हा निदर्शक म्हणाला.
जवळपास २०० निदर्शकांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. मात्र त्यांना पोलिसांनी अडविले. त्यापैकी काही जणांना अटक करून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि कालांतराने सोडून देण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी दंगल नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, असे राहुल गांधी यांनी मुलाखतीत सांगितले. जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांच्यावर दंगलीत सहभाग असल्याचा आरोप आहे.