१९८७ सालच्या हाशिमपुरा हत्याकांडात आरोपी असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या १६ कर्मचाऱ्यांची स्थानिक न्यायालयाने शनिवारी संशयाचा फायदा देऊन सुटका केली.
या संशयित आरोपींची ओळख पटवण्यात अभियोजन पक्ष यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन मुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय जिंदाल यांनी दिला.
१९८७ साली मीरत येथे झालेल्या दंगलीच्या वेळी उत्तर प्रदेशातील स्थानिक सशस्त्र दलाच्या (पीएसी) ४१ व्या कंपनीच्या जवानांनी एका शोधमोहिमेदरम्यान शहराच्या हाशिमपुरा वस्तीत एका मशिदीबाहेर जमलेल्या सुमारे ५०० मुस्लिमांच्या जमावापैकी ५० जणांना उचलून नेले. या जवानांनी त्यापैकी ४२ जणांना ठार मारले आणि त्यांचे मृतदेह एका कालव्यात फेकून देण्यात आले, असा त्यांच्यावर आरोप होता.  
गाझियाबाद येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर १९९६ साली आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या १९ जणांपैकी १७ जणांवर खून, पुरावा नष्ट करणे व कट असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार २००२ साली हा खटला दिल्ली येथे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास केलेल्या उत्तर प्रदेश सीआयडीने १६१ जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या.