जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या मोठ्या बर्फवृष्टीमध्ये गुरेज भागात लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले आहेत, लष्कराकडून ही माहिती देण्यात आली. हिमस्खलन झाल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हे पाचही कर्तव्यावर तैनात असताना ही घटना घडली. जवानांच्या बचावासाठी शोध अभियान सुरु करण्यात आले आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यांत गुरेज भागातच १० जवान आणि ४ नागरिक बर्फाच्या वादळात ठार झाले होते. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये जवानांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने मंगळवारी जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय महामार्ग आणि मुघल रोड देखील बंद करण्यात आला होता. वाहतुक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बनिहाल सेक्टरमध्ये बर्फवृष्टी आणि अन्य भागात मोठ्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राजमार्ग बंद करावा लागला.

दरम्यान, खराब हवामानामुळे येथील त्रिकुला टेकड्या, तसेच वैष्णोदेवी गुंफा येथे भाविकांसाठी पुरवण्यात येणारी हेलिकॉप्टर सेवा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. थंडीपासून संरक्षणासाठी लोक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवताना दिसत आहेत.

भारताच्या उत्तरेकडील भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने राजधानी दिल्लीतही त्याचा परिणाम जाणवत असून शहरातील अनेक भाग धुक्यात हरवून गेले आहेत. त्यामुळे विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तसेच रेल्वे गाड्याही उशीराने धावत आहेत. येथील शीत लहरींमुळे उर्वरित भारतात येत्या दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.