पाकिस्तानकडून वारंवार युद्धाचे इशारे दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर बेंजामिन नेतान्याहू यांच्या भारत दौऱ्यात इस्रायलकडून दोन अवॉक्स, एअर टू एअर मिसाइल्स खरेदीचा निर्णय होऊ शकतो. आणखी दोन आठवडयांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीमध्ये इस्रायलकडून आणखी दोन अवॉक्स सिस्टिम आणि लांब पल्ल्याची एअर टू एअर डर्बी मिसाइल्स खरेदी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

त्याशिवाय शेती, पाणी या क्षेत्रांसंबंधीही महत्वाचे करार होऊ शकतात. नेतन्याहू यांच्या भारत दौऱ्याची तयारी करण्यासाठी इस्रायलहून एक विशेष पथक दोन सप्टेंबरला नवी दिल्लीत दाखल होईल अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

सात किंवा आठ सप्टेंबरला नेतन्याहू पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतात. नेतन्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. इस्रायलमध्ये १७ सप्टेंबरला निवडणुका होणार आहेत. त्याच्या आठवडयाभरआधी नेतन्याहू भारतात येणार आहेत. भारत आणि इस्रायलचे मैत्रीसंबंध लक्षात घेता जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचे नेतन्याहू समर्थन करु शकतात. अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे.

युद्धाचा धोका लक्षात घेऊन इस्रायलकडून दोन फाल्कन अवॉक्स खरेदी करण्याची भारताची योजना आहे. मंत्रिमंडळाच्या सीसीएस समितीकडून अजून त्यासाठी हिरवा कंदील मिळालेला नाही. भारताकडे पाच अवॉक्स सिस्टिम असून पाकिस्तानकडे सात अवॉक्स आहेत. त्यांनी चीनकडून आणखी तीन ऑर्डर केली आहेत. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने ७० किलोमीटर रेंज असलेली एआयएम-१२० मिसाइल्स डागली होती. त्यानंतर आत इंडियन एअर फोर्स दीर्घ पल्ल्याची एअर टू एअर मारा करणारी डर्बी मिसाइल्स खरेदी करण्याचा विचार करत आहे.