काश्मिरी बहिणींशी लग्न करणाऱ्या बिहारमधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. दोघे तरुण भाऊ आहेत. अपहरणाच्या आरोपाखाली दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने दोघा भावांना अटक केली आहे. दोन्ही तरुणी जम्मू काश्मीरच्या रामबान जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. मुलींच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
परवेज आणि तवरेज आलम अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही रामविष्णुपूर गावातील रहिवासी आहेत. दोघे तरुण भाऊ असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दोघेही रामबान येथे कारपेंटर म्हणून काम करत असताना तरुणींच्या प्रेमात पडले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोघांनी लग्न करुन त्यांना घरी आणलं होतं. मात्र त्यावेळी मुलींच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. दोघा भावांना अटक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस बिहारमध्ये पोहोचले होते. मात्र दोन्ही बहिणींवर लग्नासाठी कोणतीही जबरदस्ती केली नसून, आपल्या मर्जीने त्यांनी आपल्याशी लग्न केलं असल्याचा तरुणांचा दावा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2019 5:52 pm