महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरुन लोकसभेमध्ये निषेध नोंदवणाऱ्या काँग्रेसच्या दोन खासदारांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी निलंबनाची करवाई केली.

हिबी इडन आणि टी. एन. प्रथपन या दोन खासदारांनी सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजपाविरोधात गोंधळ घालायला सुरुवात केली. राज्यात भाजपाप्रणित सरकारच्या पार पडलेल्या शपथविधीविरोधात या दोन्ही खासदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी करीत निषेध करायला सुरुवात केली. यामुळे सभागृहाच्या कामकाजामध्ये अडथळा येत होता.

दरम्यान, संसद परिसरातही काँग्रेसच्या इतर खासदारांनी निषेध आंदोलन केले. यावेळी त्यांनी आपल्यासोबत काही फलकही आणले होते यावर ‘संविधान वाचवा’ आणि ‘लोकशाही वाचवा’ असे लिहिले होते. तसेच त्यांच्याकडे काळ्या रंगाचा मोठा बॅनरही होता त्यावर ‘लोकशाहीची हत्या थांबवा’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेला होता. यावेळी त्यांची मार्शल्ससोबत धक्काबुक्कीही झाली.

या निलंबित करण्यात आलेल्या खासदारांच्या वर्तनामुळे लोकसभा अध्यक्ष बिर्ला हे नाराज झाले होते. तसेच सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या आपल्या या कृत्याबाबत त्यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.