लेह,जम्मू : सीओव्हीआयडी १९ या करोना विषाणूचा प्रसार होत असल्याने आधी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता,मात्र आता सर्व महाविद्यालयेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, असे लदाख प्रशासनाने म्हटले आहे.

लदाख केंद्रशासित प्रदेशाचे उच्च शिक्षण आयुक्त-सचिव रिगझियान सॅम्पहील यांनी सांगितले,की सध्याची परिस्थिती पाहून करोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्व महाविद्यालयेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ातच जाहीर करण्यात आला होता. इराणमधून परत आलेल्या महंमद अली यांचा लेहमघील एनएनएम रुग्णालयात मृत्यू झाला होता, पण त्यांची करोना चाचणी नकारात्मक आली होती.  आतापर्यंत २७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यातील ११ नमुन्यांचे निकाल हाती आले असून दोन जणांची चाचणी सकारात्मक आली आहे. लदाखमधील छुशॉट गोंगमा भागात इराणच्या यात्रेहून परत आलेले लोक असून त्याभागाला संरक्षक कडे करण्यात आले आहे. लेह विमानतळावर आतापर्यंत १८ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे.