विद्यापीठ परिसरात जलद कृती दल तैनात

अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या विरोधी गटांनी परस्परांवर केलेल्या गोळीबारात विद्यापीठातून निष्कासित करण्यात आलेले दोन विद्यार्थी ठार झाले. यामुळे विद्यापीठात जलद कृती दल तैनात करण्यात आले असून, अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहांमधील अनधिकृत रहिवाशांना हुसकावण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

शनिवार- रविवारच्या मध्यरात्री काही जणांनी मुमताज वसतिगृहात राहणाऱ्या एका जणावर हल्ला करून त्याची खोली पेटवून दिली. संबंधित ‘विद्यार्थी’ तक्रार करण्यासाठी वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहचला. या घटनेची माहिती परिसरात परस्परविरोधी गटाचे विद्यार्थी एकत्र आले आणि या दोन गटांमध्ये संघर्ष उसळला, अशी माहिती पोलिसांच्या मोहिमेचे नेतृत्व करणारे अलीगड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक गोविंद अग्रवाल यांनी दिली.

हिंसक झालेल्या या गटांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात महताब नावाचा विद्यार्थी जागीच ठार झाला. हैदोस घालणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक जीप आणि काही मोटारसायकली पेटवून दिल्या. जाळपोळीदरम्यान त्यांनी प्रॉक्टर कार्यालयाच्या इमारतीलाही आग लावली.

हा हिंसाचार इतक्या मोठय़ा प्रमाणात पसरला की, विद्यापीठ परिसरातील निरनिराळ्या ठिकाणांवरून दंगेखोरांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना दोन तास लागले. महताबच्या खूनप्रकरणी विद्यापीठातील मोहसीन इक्बाल या विद्यार्थ्यांसह आणखी सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी बहुतांश जण बाहेरचे आहेत.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद वाकिफ याला तातडीच्या उपचारांसाठी दिल्लीला हलवण्यात आले. मात्र तेथे तो मरण पावला. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, वाकिफ हा विद्यार्थी नसून तो अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विद्यापीठ परिसराजवळ राहात होता.

उत्तर प्रदेशच्या आझमगड व संभल या भागातील विद्यार्थ्यांच्या विरोधी गटांमध्ये अनेक दिवसांपासून तणाव धुमसत होता, असे विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.