वडोदरा शहरात गाईंची चोरी करणाऱ्या दोघांना क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यात असलेल्या ७ गायी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. वडोदरा शहरातील सलतवाडा परिसरात राहत असलेल्या सिद्धार्थ राबरी यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गाय चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला. सिद्धार्थ यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन या गाईची किंमत ६० हजारांच्या घरात होती.

गाईला चोरून नेतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांचं काम सोपं झालं. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन गाय चोरण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीचा शोध लावला. पोलिसांनी या गाडीच्या मालकाचा शोध घेतला, परंतू तो घरात सापडला नाही. मात्र त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आल्याची माहिती, वडोदरा क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा परिसरात गाईंची चोरी करणारी टोळी असल्याचं पोलिसांना समजलं आहे. अटकेत असलेल्या दोन आरोपींपैकी एकाकडे परिसरात कोणत्या घरामध्ये दुभत्या गाई आहेत याची माहिती घेण्याचं काम होतं. टार्गेट निश्चीत झाल्यानंतर ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने गाईची चोरी करत असल्याचं कळतंय. दोन आरोपींच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी भरुच येथून ७ चोरलेल्या गाई आणि चोरीसाठी वापरलेलं वाहन ताब्यात घेतलं आहे. दुर्दैवाने सिद्धार्थ यांची गाय यामध्ये नसल्याचं कळतंय. या टोळीतील इतर आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गाईची चोरी करुन इतरांना विकण किंवा अवैध कत्तलखान्यात देणं हे या टोळीचं काम असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.