शनिवारी काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये लष्कारांनी हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते. या दोन्ही दहशतवाद्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. कायदेशीर वैद्यकीय तपासणीदरम्यान त्या दहशतवाद्यांचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले होते. रविवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कायदेशीर वैद्यकीय तपासणीदरम्यान त्या दोन्ही दहशतवाद्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. श्रीनगरच्या सीडी रुग्णालयातून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्या दोन्ही दहशतावद्यांच्या मृतदेहांची करोना विषाणूच्या संबंधित नियमांनुसार विल्हेवाट लावण्यात आले आहे.’

कुलगाममधील अराह भागात शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात जवानांना यश आलं होतं. हे दोन्ही दहशतवादी हिजबूल या दहशतवादी संघटनेशी निगडीच असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन्ही दहशतवाद्यांपैकी एका परदेशी दहशतवाद्याचाही समावेश होता. अली भाई ऊर्फ हैदर असे त्याचे नाव असून, दुसऱ्याची ओळख पटलेली नाही. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चकमक झालेल्या ठिकाणहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.