‘गणितातील नोबेल‘ अशी ओळख असलेला पुरस्कार यंदा दोन भारतीय वंशाच्या अभ्यासकांना जाहीर झाला आहे.  मंजूळ भार्गव आणि सुभाष खोत या दोघांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.  आंतरराष्ट्रीय गणिती महासंघातर्फे (आयएमयू) दिला जाणारा रॉल्फ नेव्हालिना हा पुरस्कार खोत यांना, तर भार्गव यांना ‘फिल्ड्‌स मेडल‘ जाहीर झाले आहे.
गणित या विषयामध्ये दर चार वर्षांनी ‘फिल्ड्‌स मेडल‘ प्रदान केले जाते. हा पुरस्कार १९३६ पासून, तर रॉल्फ नेव्हालिना हा पुरस्कार १९८२ पासून दिला जात आहे. गणित या विषयामध्ये केलेल्या भरीव कामगिरीसाठी ‘फिल्ड्‌स मेडल‘ दिले जाते; तर संगणक शास्त्रामधील गणिती अंगावर काम करणाऱ्या अभ्यासकांना रॉल्फ नेव्हालिना पुरस्कार दिला जातो.
सुभाष खोत सध्या न्यूयॉर्क विद्यापीठामधील संगणक विज्ञान विभागात प्राध्यापक आहेत. संगणकीय आकडेमोडी, विश्‍लेषण यामधील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचे ‘आयएमयू‘च्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.