अमेरिकी दूतावासाच्या वाहनावर अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात असलेल्या हेरात शहरात झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचे दोन जण जखमी झाले. नाटो सैन्य माघारी जाण्याच्या तयारीत असताना या देशातील अस्थिरता कायम असल्याचे हे लक्षण मानले जात आहे.
भारतीय दूतावासावर याच शहरात झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा तेथेच अमेरिकी दूतावासाच्या वाहनावर विमानतळाकडे जात असताना अज्ञात बंदुकधाऱ्याने मोटरसायकलवरून गोळीबार केला. हल्लेखोराने रॉकेट लाँचरचा वापर करून हातबॉम्ब फेकल्याचे एंजिल जिल्ह्य़ाचे पोलिस प्रमुख बशेर अहमद यांनी सांगितले. या हल्ल्यात वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून अमेरिकी दूतावासाने या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर हेरात येथील स्पॅनिश रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या चौकशीत अमेरिका अफगाणिस्तानला मदत करीत आहे, असे सांगण्यात आले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या लष्कर ए तय्यबाने भारतीय दूतावासावर हल्ला करण्यात मोठी भूमिका पार पाडली होती, असे पाश्चिमात्य गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे.