उत्तरेकडील राज्यांत कहर

सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक मृत्यू

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असून त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहोचली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ लाखांहून अधिक झाली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या एका दिवसात आणखी दोन लाख ७३९ जणांना करोनाची लागण झाली, तर १०३८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एका लाख ७३ हजार १२३ वर पोहोचली आहे. सलग नवव्या दिवशी करोनाची लागण होणाऱ्यांच्या संख्येने एका लाख ही संख्या पार केली आहे. गेल्या नऊ दिवसांत १३ लाख ८८ हजार ५१५ जणांना करोनाची लागण झाली.

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सलग ३६ व्या दिवशी वाढ झाली असून ही संख्या १४ लाख ७१ हजार ८७७ वर पोहोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १०.४६ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून ते ८८.३१ टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत एक कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर मृत्युदर १.२३ टक्क्यांवर आला आहे.

सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

करोनाप्रसार रोखण्यासाठी दिल्ली, हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील दहा जिल्ह््यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. उत्तर प्रदेशातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा २० मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हरयाणात दहावीची राज्य मंडळाची परीक्षा रद्द झाली असून, बारावीची परीक्षा स्थगित झाली आहे. पंजाबमध्ये पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाशिवाय वर्गोन्नती दिली जाणार आहे. ओडिशा सरकराने दहावी आणि बारावीच्या परीक्षा अनिश्चिात काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

‘प्राणवायू वाया घालवू नका’

प्राणवायूचा योग्य पद्धतीने वापर करावा, तो वाया घालवू नये, अशा सूचना गुरुवारी केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आणि देशात प्राणवायूचा पुरेसा साठा असल्याचेही स्पष्ट केले. बाधित राज्यांना वैद्यकीय प्राणवायूसह अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मार्च २०२० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आंतर-मंत्रीय अधिकाऱ्यांच्या सक्षम गटाकडे सोपविण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

परदेशी लशींवर त्वरेने निर्णय

परदेशात निर्मिती करण्यात आलेल्या कोविड-१९ लशींच्या मर्यादित स्वरूपातील आकस्मिक वापराला मंजुरी मागणाऱ्या अर्जांवर भारताचे औषध नियामक असा अर्ज सादर झाल्यापासून तीन दिवसांच्या आत निर्णय घेतील, असे सरकारने गुरुवारी सांगितले. भारताचे औषध महानियंत्रक प्रमुख असलेली सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कोविड लशींच्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी व आयात परवान्यासाठी आलेल्या अर्जांची छाननी करेल. आणीबाणीच्या परिस्थितीत लशीच्या मर्यादित वापरासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर तीन कार्यालयीन दिवसांच्या आत या अर्जांवर निर्णय घेण्यात येईल.

दिल्लीत संचारबंदी

दिल्लीतील करोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सप्ताहाच्या अखेरीस संचारबंदी जारी करण्यासह अनेक निर्बंध घालण्यात येणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. मॉल, व्यायामशाळा, स्पा आणि सभागृहे बंद ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उपाहारगृहांमध्ये बसून भोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून चित्रपटगृहांमध्ये एकूण क्षमतेपैकी केवळ ३० टक्केच प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात एका दिवसात २२ हजार जणांना लागण

उत्तर प्रदेशात गुरुवारी आणखी २२ हजार ४३९ जणांना करोनाची लागण झाली असून हा दैनंदिन उच्चांक आहे. तर करोनामुळे ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे नऊ हजार ४८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात लाख ६६ हजार ३६० जणांना करोनाची लागण झाली आहे.

आखाडा प्रमुखाचे निधन

करोनासाठी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेले मध्य प्रदेशातील महानिर्वाणी आखाड्याचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचे निधन झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

कुंभमेळ्यात १७०० बाधित

हरिद्वारच्या कुंभमेळा क्षेत्रात १० ते १४ एप्रिल या कालावधीत १७०० हून अधिक लोक करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या या मेळाव्यामुळे करोनाच्या प्रकरणांमध्ये आणखी वेगाने वाढ होण्यास हातभार लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.