देशातील करोना रुग्णांची संख्या १ लाख ७५ हजारांच्या जवळ गेली आहे. दिवसेंदिवस त्यात भर पडत असून, परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याच्या कामात गुंतलेल्या परराष्ट्र मंत्रालयात करोनाचे रुग्ण आढळून आले आहे. दोन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.

परराष्ट्र मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचं समोर आलं. या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना १४ दिवसा क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद आहे. मात्र, परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचं काम परराष्ट्र मंत्रालयाकडून केलं जातं आहे. त्यांसाठी वंदे भारत मिशन सुरू करण्यात आलं.

देशातील करोनाची सद्यस्थिती कशी आहे?

मागील सात दिवसांपासून सहा हजारांच्या सरासरीनं वाढणारी रुग्णांची संख्या मागील दोन दिवसांपासून सुमारे साडेसात हजारांनी वाढत आहे. मागील चोवीस तासांमध्ये ७,९६४ नवे रुग्ण देशभरात आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार ७६३ झाली आहे. २४ तासांत तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४९७१ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील करोनाग्रस्त रूग्णाच्या मृत्यूची संख्या चीनमधील मृत्यूंपेक्षाही जास्त आहे. चीनमध्ये आतापर्यंत ४,६३८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत ८२ हजार ३७० जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ८६ हजार ४२२ जणांवर उपचार सुरू आहेत.