सगळ्यात घातक असं हायड्रोक्लोरिक अॅसिड रहिवासी भागात सोडण्याचा प्रकार केल्याचा आरोप दोन खासगी कंपन्यांवर केला जात आहे. अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे. या दोन कंपन्यांनी ६० हजार लीटरहून अधिक हायड्रोक्लोरिक अॅसिड, त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता रहिवासी भागात सोडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळाला तपास करत असताना यासंदर्भातली माहिती मिळाली. गांधीनगरमधल्या कलोल शहरातल्या मेहसाना अहमदाबाद महामार्गावरच्या जनपथ पेट्रोलपंपाजवळ अधिकाऱ्यांना दोन टँकर्स संशयास्पद रितीने आढळले. ३१ मेच्या रात्री ही घटना उघड झाली.

आणखी वाचा- ‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’! केजरीवाल सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

अधिकाऱ्यांनी या टँकर्समधल्या पदार्थाची चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये तब्बल ६० हजार लीटर्स इतकं कोणतीही उत्सर्जन प्रक्रिया न केलेलं हायड्रोक्लोरिक अॅसिड आहे. दोन्ही टँकर्सच्या चालकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली की हे टँकर्स एशियन ट्यूब लिमिटेड या कंपनीच्या कारखान्यामधून आलेले आहेत. हे अॅसिड वाटवा किंवा ओधव या भागातल्या तलावांमध्ये, गटारांमध्ये किंवा रिकाम्या जागेत सोडलं जात होतं.

आणखी वाचा- Search From Home: ‘फ्री पॉर्न’पेक्षा स्टॉक ‘ट्रेडिंग’मध्ये भारतीयांना रस; पाहा महाराष्ट्रातील ट्रेण्ड काय?

या प्रकरणातल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे उत्सर्जन प्रक्रिया न केलेलं अॅसिड रहिवासी भागात सोडल्याने प्राण्यांना तसंच परिसरातल्या लोकांनाही गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या चालकांनी सांगितलं की, एशियन ट्यूब कंपनीच्या मॅनेजरने या टँकर्सचा मालक जक्षी भरवाड याला वाटवा भागात हे टँकर्स घेऊन जायची सोय करण्यास सांगितलं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बजरंग लाल अगरवाल आणि संचालक आदित्य अगरवाल, तसंच मॅनेजर बिपीन सुथार, त्याचबरोबर टँकरचा मालक जक्षी भरवाड आणि दोन्हीही चालकांना ताब्यात घेतलं आहे. . यासंदर्भातला अधिक तपास सध्या सुरु आहे.