बिहारच्या खागरियामध्ये एका व्यक्तीच्या खात्यावर ५ लाख ५० हजार रुपये जमा झाल्याची बातमी ताजीच असताना असाच एक प्रकार बिहारच्या कटिहारमधील एका गावातून समोर आलाय. इथे लहान मुलांच्या खात्यांमध्ये थोडेथोडके नाही, तर तब्बल ९०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळतीए. ज्या मुलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालीए ते दोघंही शाळेत शिकतात आणि खात्यात जमा झालेली एवढी रक्कम पाहून त्यांना धक्का बसलाय. तर दुसरीकडे जसे कोट्यवधी रुपये शाळकरी मुलांच्या खात्यात जमा झाले तसेच आपल्याही खात्यात झाले असावेत, या आशेवर या गावातील रहिवासी त्यांचे पासबुक घेऊन एटीएम आणि बँकांमध्ये धाव घेत आहेत.

या दोन्ही मुलांची उत्तर बिहार ग्रामीण बँकेत खाती आहेत. शालेय गणवेश खरेदी करण्यासाठी आणि संबंधित खर्चासाठी पैसे देण्यासाठी सरकारी योजनेअंतर्गत काही पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे पालकांसोबत ते गावातील एका सार्वजनिक इंटरनेट केंद्रात जाऊन आले की नाही हे तपासण्यासाठी गेले. तिथे बँकेचे स्टेटमेंट तपासल्यावर त्यांना त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे पाहून धक्का बसला. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ६वीत शिकणाऱ्या आशिषच्या खात्यात ६.२ कोटी रुपये आढळले. तर, गुरू चरण विश्वास नावाच्या मुलाच्या खात्यात तब्बल ९०० कोटी रुपये जमा झाले. दरम्यान, ग्रावातील प्रमुखांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून या मुलांच्या बँक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतीए.

कटिहार जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दोन शाळकरी मुलांच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती मला काल संध्याकाळी मिळाली. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. हा प्रकार नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज सकाळी बँकेत तपासणी केली. शाखा व्यवस्थापकाने सांगितले की तांत्रिक अडचणींमुळे त्या मुलांच्या खात्यात तेवढी रक्कम दिसत आहे. मात्र, वास्तविक पैसे त्यांच्या खात्यात नव्हते. यासंदर्भात मी बँकेकडून अहवाल मागितला आहे.”

दरम्यान, खात्यात पैसे जमा झाल्याचं हे बिहारमधील दुसरं प्रकरण आहे. याआधी रनजीत दास यांच्या दक्षिण बिहार ग्रामीण बँकेतील खात्यावर साडेपाच लाख रुपये जमा करण्यात आले. मात्र नंतर बँक अधिकाऱ्यांना ही रक्कम चुकून या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्याचं समजलं. बँकेने दास यांच्याशी संपर्क साधला आणि पैसे तातडीने बँकेला परत करण्यासंदर्भात मागणी केली. मात्र मानसी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या बख्तियार गावात राहणाऱ्या दास यांनी हे पैसे परत करण्यास नकार दिला. बँकेने अनेकदा नोटीस पाठवूनही दास यांनी हे पैसे परत देण्यास नका दिला. इतकच नाही तर दास यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आपण हे सर्व पैसे खर्च केल्याचंही सांगितलं.

“हे पैसे मला मोदींनी पाठवलेत,” म्हणत बँकेकडून चुकून जमा झालेले साडेपाच लाख परत देण्यास शिक्षकाचा नकार; अखेर…