अंतरिम आदेशास न्यायालयाचा नकार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजल गुरूच्या फाशीविरोधात कार्यक्रम घेऊन देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात अटक केलेला विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याचे सहकारी असलेल्या उमर खालीद व अनिरबन भट्टाचार्य यांना शरणागती पत्करताना संरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने ठरवले आहे. या दोघांनाही शरणागती पत्करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अंतरिम आदेश जारी करण्यास नकार दिला. न्या. प्रतिभा राणी यांनी सांगितले की, त्यावर उद्या सुनावणी होईल. न्यायालयाने म्हटले आहे की, या दोघांनी ठरावीक दिवशी, ठरावीक वेळी व ठरावीक ठिकाणी शरणागती पत्करावी, पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देतील. पोलीस आयुक्त प्रेमनाथ यांनी याला हरकत घेतली व ते शरण येणार आहेत ते ठिकाण पोलिसांना खुले नाही, असे त्यांनी सांगितले. आक्षेपाची कारणे पोलीस उपायुक्त व आरोपीच्या वकिलांनी चेंबरमध्ये सांगावीत, असे न्यायाधीशांनी सांगितले.