बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी राज्यातील ४९ मतदारसंघांमध्ये ५७ टक्के मतदान झाले. हे मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. वयोवृद्ध आणि महिला नागरिकांनी मोठय़ा संख्येत मतदान केले.

पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघ जनता दल (यू)चे बालेकिल्ले आहेत. २०१० साली भाजपशी युती करून झालेल्या निवडणुकीत या पक्षाने २९ जागा जिंकल्या होत्या. या वेळी जद (यू) नव्या जोडीदारासह पहिल्या टप्प्यातील ४९ पैकी २९ जागांवर निवडणूक लढवीत आहे. या वेळी १७ जागांवर उमेदवार उभे केलेल्या राजदने गेल्या वेळेस येथून फक्त ४ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०१४ साली झालेल्या निवडणुकीत लोकसभा क्षेत्रातील आठ मतदारसंघांपैकी बांका व भागलपूर या २ जागा जिंकून येथे पाय रोवले होते.

तारापूर, जमालपूर, सूर्यग्रह, राजौली (राखीव), गोविंदपूर, सिकंदरा (राखीव), जमुई, झाझा व चकाई या नक्षलग्रस्त भागांतील ९ मतदारसंघांमध्ये दुपारी ३ वाजता मतदान संपले. कुठेही अनुचिच घटना घडल्याचे वृत्त नाही, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी सांगितले.खगरिया येथे सर्वाधिक,  ६३ टक्के मतदान झाले.

पहिला टप्पा

एकूण जागा-  ४९

’सरासरी मतदान- ५७ टक्के

’सर्वाधिक मतदान- खगरिया (६३ टक्के)

पंतप्रधानांची नितीशकुमार-लालूप्रसादांवर टीका

जेहानाबाद/भाबुआ: लाचखोरी प्रकरणात जनता दलाचा ज्येष्ठ मंत्री अडकल्याच्या मुद्दय़ावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना लक्ष्य केले. त्यांना जयप्रकाश नारायण यांचा वारसा सांगण्याचा अधिकार नाही, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला. महाआघाडीचे नेते घाबरल्यानेच माझ्या जाहीरसभांचे चित्रवाणी वाहिन्यांवरून होणारे थेट प्रसारण रोखण्याची त्यांची धडपड सुरू होती.  मतदानाच्या पूर्वीच सरकारमधील ज्येष्ठ मंत्री अवधेश प्रसाद कुशवा लाच घेताना स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याची नामुष्की ओढवली. अशा नेत्यांमुळे बिहारची प्रतिमा खराब झाल्याची टीका मोदींनी केली.

लालूप्रसादांचे पंतप्रधानांना उत्तर

पाटणा : बिहारमध्ये विजय मिळवण्यात भाजपला अपयश आले तर पंतप्रधान राजीनामा देणार काय, असा सवाल राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे. सार्वजनिक जीवनात ज्यांना उच्च मूल्ये पाळता येत नाहीत, त्यांनी आम्हाला बौद्धिक देऊ नये, अशी ट्विप्पणी लालूंनी केली आहे. जेहानाबाद व भाबुआ येथील सभांमध्ये पंतप्रधानांनी राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांच्या स्टिंग ऑपरेशनवरून महाआघाडीच्या नेत्यांना सार्वजनिक जीवनात वावरताना काही लाज उरली आहे काय, असा सवाल केला होता. त्यावर लालूंनी उत्तर दिले आहे.