करोनामुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून याचा प्रभाव आता दैनंदिन आयुष्यासोबत सणांमध्येही पहायला मिळत आहे. मास्क, सॅनिटायजर हे आता प्रत्येकाच्या रोजच्या वापराचा भाग झाले आहेत. दरम्यान कोलकात्यात रविवारी एका देवीच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आहे. या देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळे सोन्याचा मास्क घालण्यात आला आहे. इतकंच नाही तर हातांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. या मूर्तीचं काम सध्या सुरु असून रविवारी फक्त तिची एक झलक दाखवण्यात आली. मात्र ही मूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मूर्तीच्या हातामध्ये मास्क, थर्मल गन तसंच इतर गोष्टी ठेवण्यात आल्या असून याद्वारे लोकांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. करोनाच्या या संकटात आरोग्य आणि सुरक्षा किती महत्वाची आहे यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. “सोन्याचा मास्क हा खूप मोठा दागिना म्हणून पाहू नका,” असं आवाहन तृणमूलच्या आमदार आणि बंगाली गायक अदिती मुनशी यांनी केलं आहे.

“बंगालमधील प्रत्येक मुलगी ही गोल्डन गर्ल असून प्रत्येक पालक आपल्या मुलीला सोन्याने मढवू इच्छित आहे अशी यामागे कल्पना आहे. आम्ही वेडे म्हणून दोन तोळ्याचं मास्क लावलेलं नाही. आम्ही करोनाच्या काळात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा इच्छेने हे केलं आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

गतवर्षी करोना संकटामुळे कोलकाता हायकोर्टाने पूजा मंडपात उपस्थित न राहण्यासंबंधी आदेश दिले होते. दरम्यान यावर्षी लोक पुन्हा एकदा नवरात्रीच्या निमित्ताने सण साजरा करण्यासाठी तयारी करत आहेत.